रावेरात विरोधाची तर जळगावात मौनी भूमिका
जळगाव- लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र शिवसेना भाजपापासून अलिप्तच असल्याचे चित्र दिसुन येत आहे. दरम्यान रावेर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाविरोधी भूमिका घेतली असुन जळगाव मतदारसंघात शिवसेनेने मौनच बाळगले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत युती झाली आहे. युतीधर्मानुसार जागावाटप देखिल झाले आहे. असे असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र ‘युती’धर्म पाळला जात नसल्याचे चित्र आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपाचे उमेदवार जाहीर होऊनही प्रचारात उतरले नसुन ते अलिप्तच असल्याचे दिसुन येत आहे.
शिवसेनेची भूमिका अस्पष्ट
जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी खडसेंना जाहीर विरोध करून निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणार नसल्याची भूमिका स्विकारली आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात पुर्वीपासूनच शिवसेना विरोधात राहील्याने भाजपाने देखिल त्यांना फारसे महत्व दिले नसल्याचे दिसते. जळगाव लोकसभा मतदारसंघातुन आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. माजी आ. आर. ओ.पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून लोकसभेसाठी तयारी देखिल केली होती. त्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत आणि माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत मेळावा देखिल घेण्यात आला होता. मात्र युती जाहीर झाल्यानंतर ही जागा भाजपाकडेच कायम राहील्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे जोशात आलेले पदाधिकारी नाराज झाले. त्यामुळे शिवसेनेने जळगाव मतदारसंघात उघड विरोध न करता भाजपापासून अलिप्तच राहणे पसंत केले आहे.
भाजपाकडुनही निमंत्रण नाहीच
जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार जाहीर झाले असुन याठिकाणी प्रचारासाठी किंवा बैठकांसाठी शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकार्याला निमंत्रीत केले जात नसल्याची परीस्थीती आहे. आज जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांची उमेदवार आ. स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. मुळात शिवसेनेच्या पदाधिकार्यांना निमंत्रणच दिले गेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भाजपालाही जुळवुन घ्यावे लागणार
जळगाव आणि रावेर मतदारसंघातील बदलती राजकीय परीस्थीती लक्षात घेता भारतीय जनता पार्टीलाही शिवसेनेशी जुळवुन घ्यावे लागणार आहे. कारण जळगाव मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने शिवसेनेची नाराजी आ. स्मिता वाघांसाठी डोकेदुखी ठरू शकते.