मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत शिवसेना खासदारांची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे जालना शहरात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या एकदिवसीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, प्रदेश कार्यकारिणीतील १ हजार २०० सदस्य उपस्थित असणार आहेत.
सोमवारी सकाळी १० वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. जालना शहरातील कलश सीड्स कंपनीच्या मैदानावर ही बैठक होणार असून, बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्यांना दिलेल्या विषयाचा आढावा घेताना, या बैठकीत त्यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीनंतर जालना शहरातील मामा चौकात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.