मुंबई: लोकसभे प्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेची युती कायम राहणार असून या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येत्या १५ दिवसांच्या काळात जागावाटपाबाबतचा निर्णय घेऊ, प्रसंगी काही जागांची अदलाबदल करण्याची देखील तयारी असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदारांच्या मुंबईतील प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
भाजप आणि शिवसेनेची युती विधानसभेच्या निवडणुकीत राहणार नाही अशी चर्चा सुरु आहे, मात्र युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या चर्चा चुकीच्या असून ही युती अभेद्य आहे. भाजप आणि शिवसेनेत काही जागांबाबत मतभेद नक्कीच आहेत. मात्र, त्याबाबत येत्या १५ दिवसांच्या काळात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही १५ दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही युतीचेच सरकार राज्यात आणणार आहोत, नव्हे राज्यातील जनताच आमचे सरकार आणणार आहे. उद्या पासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून या यात्रेदरम्यान जनादेश युतीच्या पाठिशी आणण्याचे काम आपण करणार असल्याचे मुख्यमंत्री पक्ष प्रवेश सोहळ्यात म्हणाले.