मुंबई :- आगामी निवडणूक जस-जशी जवळ येत आहे तस-तशी भाजप-शिवसेना युती करणार कि नाही, यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून पक्षात दोन गट पडले आहेत. मात्र, यावर शिवसेनेतील अनेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठिंब्यावर विधानपरिषद किंवा राज्यसभेत असलेले नेते या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
तर सेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही
२०१४ निवडणुकीत मोदी लाटेमुळे शिवसेनेने भाजपशी युती केल्यामुळे लोकसभेत १८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल. मात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे यावेळी जर भाजपासोबत युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचे एका खासदाराने सांगितले आहे.