राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील सर्वात कमी मताधिक्याने होते विजयी
जळगाव: विधानसभा निवडणुकीसाठी राज्य पातळीवर भाजपा आणि शिवसेनेत युतीबाबत चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. अद्याप युतीची घोषणा झाली नाही. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती तोडल्यानंतरही राज्यात मोठे यश मिळविले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी जळगाव शहर मतदारसंघातुन भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांना युती नसतांना सर्वाधिक म्हणजेच 42 हजार 314 मतांचे मताधिक्य मिळाले होते. तर दुसरीकडे देखिल आघाडी नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांना एरंडोल-पारोळा मतदारसंघातुन सर्वात कमी म्हणजेच अवघे 1983 मतांचे मताधिक्य मिळाले होते.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जाहीर झाली आहे. तर भाजपा आणि शिवसेनेत मात्र युतीच्या चर्चेचे गुर्हाळ सुरूच आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अशीच चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. मात्र ही चर्चा यशस्वी न ठरल्याने भाजपाने माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्याद्वारे युती तोडल्याची घोषणा केली होती. युती न झाल्याने राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलेच राजकीय युध्द रंगले होते. जळगाव जिल्ह्यात देखिल सर्व 11 मतदारसंघात भाजपाने उमेदवार दिले होते. त्यापैकी जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर, रावेर, चाळीसगाव आणि भुसावळ या मतदारसंघातुन भाजपाचे सहा तर शिवसेनेचे चोपडा, पाचोरा, जळगाव ग्रामीण या तीन मतदार संघातुन आमदार निवडून आले होते. 11 मतदारसंघांपैकी जळगाव शहर मतदारसंघाची निवडणुक मोठी काट्याची होती.
सुरेश भोळेंनी खडसे, महाजनांना टाकले मागे
शिवसेनेकडुन जळगाववर एकहाती वर्चस्व असलेले सुरेशदादा जैन तर भाजपाकडुन नगरसेवक राहीलेले राजूमामा भोळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. याकाळात सुरेशदादा हे घरकुल घोटाळ्याच्या आरोपावरून तुरूंगात होते. त्यामुळे त्याचा अनपेक्षित फायदा देखिल भाजपाला झाला होता. नवखे असतांनाही आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्ह्यातुन सर्वाधिक 42 हजार 314 मतांचे मताधिक्य मिळवुन सुरेशदादांचा पराभव केला होता. मताधिक्यामध्ये भाजपाचे मातब्बर नेते आमदार एकनाथराव खडसे, मंत्री ना. गिरीष महाजन यांना देखिल आमदार भोळे यांनी मागे टाकले होते.
डॉ.सतीश पाटीलांचा निसटता विजय
2014 च्या निवडणुकीत एरंडोल-पारोळा मतदारसंघाची लढत मोठी चुरशीची ठरली होती. शिवसेनेकडुन चिमणराव पाटील तर राष्ट्रवादीकडुन डॉ. सतीश पाटील यांच्यात जोरदार सामना झाला. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत या मतदारसंघाची उत्सुकता लागून होती. भाजपाचे उमेदवार मच्छींद्र पाटील आणि मनसेचे नरेंद्र पाटील यांना मिळालेल्या मतांचा फटका शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांना बसला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील यांना अवघे 1983 मतांचे मताधिक्य मिळाले होते. जिल्ह्यातील या दोन्ही लढती महत्वपुर्ण मानल्या गेल्या. कारण जळगाव शहरावर सुरेशदादांचे असलेले वर्चस्व त्याकाळात आमदार भोळेंनी संपविले होते.