युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम

0

मुरूड । छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेच्या सहभाग आवाहनपत्राचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषदेत करण्यात आले.

देशातील ऐतिहासिक गडकिल्ले ही तरुण पिढीची स्फूर्तीस्थाने करणे. गतवैभवाच्या या ऐतिहासिक साक्षीदारांचे संवर्धन आणि विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई जवळच्या समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणी प्रसंगी बोलताना जाहीर केली. या योजनेंतर्गत रायगड किल्ल्याची देशात सर्वप्रथम संवर्धन आणि विकासाकरिता निवड केली आहे. यंदाच्या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेत राज्यभरातील युवक-युवतींनी सहभागी होऊन महाराजांप्रति आदर व्यक्त करावा, असे आवाहन अभय यावलकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी सहभागी होणार
रायगड किल्ला संवर्धन आणि विकास योजनेचे प्रमुख रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणामध्ये आपल्या रायगड किल्ला विकास व संवर्धन यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्यासह प्रदक्षिणार्थीसोबत सक्रिय सहभागी होणार असल्याचे डॉ. सूर्यवशी यांनी सांगितले. रायगड किल्ला विकास योजनेअंतर्गत रायगड प्रदक्षिणा मार्ग तयार करण्याचेही काम नियोजित विकास योजनेमध्ये आहे. त्याच अनुषंगाने प्रत्यक्ष प्रदक्षिणार्थीसमवेत सहभागी होऊन रायगड प्रदक्षिणा मार्गाची पाहणी करून या रायगड प्रदक्षिणा मार्गाच्या कामास अंतिम स्वरूप देण्याचा मनोदय डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रायगड प्रदक्षिणेत सहभागी होणार्‍या प्रदक्षिणार्थींना रायगड आणि परिसराच्या इतिहासाची माहिती देण्याकरिता ज्येष्ठ शिवकालीन इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान या उपस्थित राहणार आहेत, तर गिर्यारोहण व गडभ्रमंतीचे अनन्यसाधारण महत्त्व प्रदक्षिणार्थींना सांगून आपले अनुभव कथन करण्याकरिता भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवणारे एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांनी यावेळी दिली.