युपीएससी, एमपीएससी अभ्यासक्रमाला गेलेले खान्देशातील विद्यार्थी परतले

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात रेल्वे, बस व सर्व वाहतूक बंद झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने दिल्ली येथे युपीएससी-एमपीएससीचे क्लासेस करणारे खान्देशशातील विद्यार्थी अडकले होते मात्र राज्य शासनाने अडकलेल्यांसाठी 04076 विशेष रेल्वे सेवा स्वखर्चातून सुरू केल्यानंतर रविवारी हे खान्देशातील तब्बल 367 विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर परतले. या विद्यार्थ्यांना 14 दिवस होम कॉरंटाईनचे शिक्के मारून आपापल्या घरी बसेसद्वारे रवाना करण्यात आले.

खान्देशासह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा
नवी दिल्लहून परतणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये जळगाव 27, बुलढाणा 30, अकोला 24, अमरावती 20, यवतमाळ 17, नागपूर 33, गोंदीया 8, भंडारा 11, वर्धा 14, चंद्रपूर 17, गडचिरोली 8, धुळे 14, नंदुरबार 9, औरंगाबाद 31, जालना 13, परभणी 25, नांदेड 32 व हिंगोली येथील 15 असे एकूण 367 विद्यार्थी भुसावळ बस स्थानकावरून आपापल्या गावाकडे बसेसने रवाना करण्यात आले. त्यासाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा मोलाचा ठरला. रविवारी दुपारी 3.10 वाजता रोजी विशेष रेल्वेने भुसावळात दाखल झाली तर या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वरंटाईनचे शिक्के मारून त्यांना रवाना करण्यात आले.

विद्यार्थ्यांना ‘निर्मल’ दातृत्वाचा पुन्हा परीचय
गेल्या दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीत अडकलेल्या व घराची ओढ लागलेल्या विद्यार्थ्यांचे रविवारी भुसावळ जंक्शनवर आगमन होणार असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था भुसावळातील साई सेवक निर्मल (पिंटू कोठारी) यांनी घेतली होती. सुरूवातीला विद्यार्थी सकाळी येणार असल्याचा निरोप आल्याने वडा-पावची व्यवस्था करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात गाडी दुपारी तीन वाजता आल्याने विद्यार्थ्यांना अस्सल खान्देशी खिचडी जेवणात देण्यात आली तसेच वडा-पाव, पाण्याची बॉटल कोठारी यांनी स्व-खर्चाने दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.