नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी-2016चा निकाल बुधवारी सायंकाळी घोषीत करण्यात आला. यामध्ये नंदिनी के. आर. ही देशात पहिली आली असून दुसर्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसर्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी आला आहे. तर, महाराष्ट्रातून विश्वांजली गायकवाडने अकरावा क्रमांक पटकावला आहे. याचबरोबर स्वप्निल खरे 43 वा, तर स्वप्निल पाटील याने 55 वा क्रमांक पटकावला आहे. यात जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून भुसावळ तालुक्यात सासर असणार्या प्रज्ञाचक्षू प्रांजल लहेनसिंग पाटील यांनी यात 124व्या क्रमांकाने बाजी मारली आहे हे विशेष.
प्रांजल पाटील यांचे यश : प्रांजल लहेनसिंग पाटील यांना सातव्या वर्षी अंधत्व आले तरी त्या उमेद हरल्या नाहीत. त्यांनी गेल्या वर्षी यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली होती. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण उल्हासनगरातील आरजेएस शाळेत आणि पुढे दहावीपर्यंतचे दादरच्या कमला मेहता अंधशाळेत झाले. चांदीबाई महाविद्यालयात अकरावी-बारावी आणि मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्या मुंबई विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. याआधी त्यांना युपीएससीमध्ये 773वी रँक मिळाली होती. यामुळे त्यांना इंडियन रेल्वे अकाऊंट सेवा मिळाली होती. या वर्षीच्या परिक्षेत मात्र त्यांना 124वी रँक मिळाली असल्याने त्यांना जागांच्या उपलब्धतेनुसार आयएएसची रँक मिळू शकते. प्रांजल पाटील यांचे सासर भुसावळ तालुक्यातील आहे.
दीपस्तंभचे यश : दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाची मार्गदर्शिका प्रज्ञाचक्षु (अंध) प्रांजल लहेनसिंग पाटील हिने 124 गुणानुक्रम पटकावून आयएएसपदी निवड झाली आहे. तसेच दीपस्तंभ मुलाखत प्रशिक्षणाच्या विद्यार्थीनी व मनोबल केंद्राच्या मार्गदर्शिका अल्पना दुबे यांनी 654 गुणानुक्रम पटकाविला आहे. जळगाव येथील योगाप्रशिक्षक हेमांगीनी सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ संजय सोनवणे यांनी 293 गुणानुक्रम पटकविला आहे. पाचोरा येथील प्राथमिक शिक्षक संजय महाजन यांचे चिरंजीव मनोज
युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर
सत्यवान महाजन यांना 903 गुणानुक्रम मिळाला आहे. तसेच मुक्ताईनगर येथील डॉ. कुलदीप सुरेश सोनवणे यांना 384 गुणानुक्रम मिळाला आहे. चोपडा तालुक्यातील तावसे खु येथील स्वेच्छा निवृत्त पोलीस दिलीप पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील 824 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झालेत.तसेच चोपडा येथील आशिष पाटील हे देखील उत्तीर्ण झालेत. दीपस्तंभ परिवाराचे सदस्य नागपूर येथील पुनीत डागा 271 क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. यशस्वीतांचे रतनलाल सी बाफना , पुखराज पगरिया, भरत अमळकर , यजुर्वेन्द्र महाजन यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले. मनोबल प्रकल्पाचे संचालक यजुर्वेन्द्र महाजन यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रांजल चे यश संबंध भारतातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे,मागील वर्षी त्यांना भारतीय रेल्वे सेवेत पद मिळाले परंतु जिद्दीच्या बळावर तिने आयएएस चे शिखर सर केले.
‘दर्जी’च्या तीन विद्यार्थ्यांचे यश
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यु.पी.एस.सी. परीक्षेच्या अंतिम निकालात दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात सौरभ सोनवणे, कुलदीप सोनवणे व सदानंद कलसू हे यशस्वी झालेले आहेत. यातील सौरभ संजय सोनवणे हा जळगांव शहरातील रहिवाशी असून 293 च्या रँकने बाजी मारलेली आहे. तसेच कुलदीप सुरेश सोनवणे हा उचंदा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथील रहिवाशी असून 384 व्या रँकने यशस्वी झालेला आहे. मागील यु.पी.एस.सी. परीक्षेत देखिल तो यशस्वी ठरलेला असून आय.पी.एस. पदी त्याची निवड झालेली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळविलेले यश हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. नांदेड येथील सदानंद रामराव कसलू या विद्यार्थ्यांने 724 व्या रँकने यश मिळविलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे गोपाल दर्जी यांच्यासह सौ. ज्योती दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा व दर्जी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.