16 पैकी 14 महापालिकांत भाजपचे महापौर
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लोकांनी काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. एवढेच नाही तर अमेठी आणि रायबरेलीतील लोकांनीदेखील काँग्रेसला नाकारले, अशी प्रतिक्रिया देताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशच्या स्थानिक निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्याक्ष महेंद्रनाथ पांडे आणि इतर मान्यवरांनी हा विजय सर्वांच्या एकीचा विजय असल्याचे सांगितले. तर या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत. देशात पुन्हा एकदा विकास जिंकला आहे, अशी सूचक प्रतिक्रिया पंतप्रधानांनी नोंदवली. या निवडणुकींमध्ये महापौरपदाच्या 16 पैकी 14 जागांवर भाजप निवडून आला आहे. एकूण 652 जागांपैकी 475 जागा सत्ताधारी भाजपने जिंकल्यात.
काँग्रेस, सपा, बसपाला धूळ चारली
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासह काँग्रेसलाही पराभवाची धूळ चारून सत्तेत आलेल्या भाजपची लाट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम असल्याचे दिसून आले. महापौरपदाच्या 16 जागांपैकी भाजपने मथुरा, अयोध्येसह 14 जागांवर विजय मिळवला तर दोन ठिकाणी बसपाचे महापौर विराजमान होणार आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा मात्र यावेळीही पार धुव्वा उडाला आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. देशात विकासाचा पुन्हा एकदा विजय झाला असून, सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे खूप खूप अभिनंदन. हा विजय आपल्याला जनकल्याणासाठी आणखी प्रेरित करेल, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तर योगी आदित्यनाथ यांनी शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासन आणि निमलष्करी दलाचे धन्यवाद. केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य जनतेसाठी केलेल्या प्रयत्नांना, विकास कामांना मतदारांनी दिलेली ही पावती आहे. अशा भावना व्यक्त केल्या.