युपीतील लाट पंजाबमध्ये सपाट

0

मुंबई । देशातील विधानसभांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पहायला मिळालेली असताना बाजूला असलेल्या पंजाबमध्ये मात्र भाजप पुर्णपणे अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. मागील दहा वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला पंजाबमधील जनतेने सपशेल नाकारले आहे.

पंजाबच्या निवडणुकीत अमली पदार्थ आणि नशाखोरी हे प्रचाराचे मुख्य मुद्दे होते. राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री सुखबरसिंग बादल यांच्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांनी राज्यात पाय रोवल्याचा आरोप सातत्याने होत होता. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनेही पाकिस्तानातून येणार्‍या अमली पदार्थांची तस्करी करण्यात बादल सरकारला अपयश आल्याचे प्रचारादरम्यान ठासून सांगितले होते. मागील दहा वर्षांमध्ये विशेषत: पंजाबच्या ग्रामीण भागात अनेक युवकांचा त्यामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे अकाली सरकारच्या अकार्यक्षमेतेमुळे गावात राहणार्‍या नातेवाईकांचे मृत्यू होत असल्याची भावना राज्यातील अनिवासी भारतीयांच्या मनात निर्माण झाली होती.

याकारणामुळे पंजाबमधील अनिवासी भारतीय राज्यातल्या निवडणुकीत यावेळी खूपच रस घेतला होता. अनेक अनिवासी भारतीयांनी स्वखर्चाने भारतात येऊन सरकारविरोधी प्रचार केला होता. याशिवाय पैसे कमावण्यासाठी परदेशात गेलेल्या अनिवासी भारतीयांच्या जमिनी बादल सरकारने लाटल्याचा आरोपही यावेळी केला गेला. बादल सरकारने मागील दहा वर्षांमध्ये राज्यातील अनिवासी भारतीयांसाठी काही केले नसल्याचाही आरोप होत होता.

मुख्यमंत्री म्हणून प्रकाशसिंग बादल कार्यरत असले तरी सगळी सुत्रे सुखबीरसिंग बादल यांच्यामार्फतच हलत असत. या युतीच्या राज्यातील पराभवाला सुखबरसिंग बादल यानांच जबाबदार धरावे लागेल. त्यांनी घेतलेले काही निर्णय, काही निर्णय घेण्यात दाखवलेला निष्काळजीपणा यामुळेच भाजपला पंजाबात पराभवाची चव चाखावी लागली.