लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात अज्ञात लोकांनी तीन मटणाची दुकाने जाळली. या आगीत तिनही दुकाने जळून खाक झाली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. कडवे हिंदूत्ववादी पशुप्रेमी आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर अशा घटनांमध्ये वाढ होण्याची चिंता व्यक्त होत असतानाच ही घटना घडल्याने उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांकांमध्ये भितीचे वातावण पसरू लागले आहे. हाथरसमधील कोतवाली परिसरातील काशीराम कॉलनीत रात्री उशीरा अज्ञात लोकांनी मटणाच्या तीन दुकानांना आग लावली. दुकान मालकांनी सकाळी हा प्रकार पाहताच पोलिसांना घटनेची माहीती दिली. या घटनेनंतर दुकानदारांनी सरकारवर आपला संताप व्यक्त केला. हे सरकार आल्यानंतर आमचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. ही दुकानेच आमची रोजीरोटी होती. आता आम्ही पोट कसे भरणार, असा सवाल या दुकानदारांनी केला. युपीमधील कत्तलखाने योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापुर्वीच दहशतीमुळे बंद करण्यात आले आहेत.