युपीत ‘योगी’राज सुरू

0

लखनौ : राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी रविवारी शपथ घेतली. तर, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली. दुपारी दोनच्या सुमारास लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यालाया शपथ ग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राम नाईक, गृहमंत्री राजनाथ सिंह, लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, वैंकय्या नायडू यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचीही उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी लालकृष्ण आडवाणी यांचे आशीर्वाद घेतले.

24 मंत्र्यांना शपथ
कॅबिनेट मंत्री म्हणून सुर्य प्रताप शाही, सरेश खन्ना, स्वामी प्रसाद मौर्य, सतीश महाना, राजेश आग्रवाल, रीता बहुगुणा जोशी, दारा सिंह चौहान, धरम पाल सिंह, एसपी सिंह बघेल, सत्यदेव चौधरी, रमापती शास्त्री, यजप्रताप सिंह, ओम प्रकाश राजभर, ब्रजेश पाठक, लक्ष्मी नारायण चौधरी, चेतन चौहाण, श्रीकांत शर्मा, राजेंद्र प्रताप सिंह, सिध्दार्थ नात सिंह, मुकुट बिहारी वर्मा, आशुतोष टंडन, नंद गोपाल नंदी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते.

‘उत्सवाच्या नावाखाली हुल्लडबाजी नको’
या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, शपथ ग्रहण करण्यापुर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अ‍ॅक्शन घेण्यास सुरवात केली होती. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक यांना योगींनी तंबी दिली की, उत्सवांच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी यापुढे खपवून घेतली जाणार नाही.

 कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख
उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप नेते सुरेश खन्ना यांनी आदित्यनाथ यांच्या नावाची शिफारस केली आणि नायडू यांनी त्याला पाठिंबा दिला. सर्व सहमतीनेच आदित्यनाथ यांना निवडण्यात आल्याचे आणि या पदासाठी इतर कोणाचेही नाव पुढे न आल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून, आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.

 …तर राम मंदिर कधीच होणार नाही: सेना
‘आदित्यनाथ हे पूर्ण बहुमतासह देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात राम मंदिर झाले नाही, तर पुन्हा कधीही ते होणार नाही’, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्ववादी पार्श्‍वभूमी असलेल्या आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राऊत यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर ते म्हणाले, ‘भाजपच्या या निर्णयावर बोलण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आपल्या इच्छेनुसार कुणालाही मुख्यमंत्री करू शकते. मात्र आदित्यनाथ यांनी आता वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत. वादग्रस्त बोलून आता काहीही होणार नाही. उलट वातावरण दूषित होईल. राज्यात अराजकताही निर्माण होऊ शकते. आता त्यांनी केवळ विकासाचीच भाषा बोलायला हवी.’

’योगी मुख्यमंत्री होणं ही डाव्यांना सणसणीत थप्पड’
आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या भाजपच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सावध प्रतिक्रिया उमटत असताना केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. ’योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होणे ही 21व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बातमी असून डाव्यांना ही सणसणीत थप्पड आहे,’ असे केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

आदित्यनाथ यांची निवड भाजपमधील काही नेत्यांबरोबरच अन्य पक्षांनाही बुचकळ्यात टाकणारी होती. राजकीय वर्तुळातून यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. काहींनी टीकाही केली. एकेकाळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या भाजपमधील साध्वी उमा भारती यांनी मात्र योगींच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. योगींवर टीका करणार्‍यांचा त्यांनी सणसणीत समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ‘मोदी पंतप्रधान होणे आणि योगी मुख्यमंत्री होणे ही माझ्यासाठी 21व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बातमी आहे. योगी आदित्यनाथ हे माझे लहान भाऊ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं ही डाव्यांना सणसणीत चपराक आहे. योगी हे विकासाबरोबरच राष्ट्रवादाचा अजेंडा घेऊन वाटचाल करतील.’