युपीतील पतंजली फूड पार्क रद्द

0

लखनो-योगगुरु बाबा रामदेव यांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडून चांगलाच दणका बसला आहे. ग्रेटर नोयडामध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मेगा फूड पार्कसाठी देण्यात आलेली जमीन रद्द करण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. त्यामुळे पतंजली फूड पार्कला आता दुसऱ्या राज्यामध्ये प्रकल्प शिफ्ट करावा लागणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १० हजार जणांना रोजगार मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ‘उत्तर प्रदेश सरकारने जमीन देण्याचा निर्णय रद्द केला आहे, या सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचं जीवन बदलवणारा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, आता हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवण्यात येईल, अशी माहिती बालकृष्ण यांनी ट्विटरद्वारे दिली.

उत्तर प्रदेश सरकारने जमीन रद्द केल्यानंतर बालकृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सराकारचा व्यवहार निराशाजनक आहे, त्यांनी सहकार्य केले नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती सुधारली जाणार नाही अशी टीका त्यांनी केली. तसंच, प्रस्तावित पतंजलि फूड पार्क आता दुसऱ्या राज्यात नेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.