युपीत ‘सायकल’ सुस्साट!

0

पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की

लखनऊ : ईशान्येतील तीन राज्यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणार्‍या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बुधवारी पोटनिवडणुकांत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून, मायावतींचा बसप आणि समाजवादी पक्षाने एकत्र येत या निवडणुकांत भाजपाला पराभवाची धूळ चारली. विशेषतः गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातला पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असल्याने ही पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या निवडणुकांत समाजवादी पक्षाची ‘सायकल’ सुस्साट सुटलेली दिसून आली.

राजद, जदनेही भाजपला धूळ चारली
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घरचा मतदारसंघ आणि 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारली. भाजपचे केशवप्रसाद मौर्य यांचे वर्चस्व असलेल्या फूलपूर मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या प्रवीण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र पटेल यांचा 21 हजार 881 मतांनी पराभव केला. फुलपूरच्या जागेवर सपा उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपच्या कौशलेंद्र पटेल यांना 59 हजार 613 मतांनी धूळ चारली. बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा विजय मिळवत भाजपचा 61 हजार 788 मतांनी पराभव केला. येथे राजदच्या सरफराज आलम यांनी भाजपच्या प्रदीप सिंह यांना पराभूत केले. बिहारमध्ये दोन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक झाली. जहानाबाद येथेही भाजपला दणका देत, राजदने विजय मिळवला. केवळ भभुआ येथे भाजपच्या रिंकी पांडे या विजयी ठरल्या आहेत.

सपा-बसपाच्या राजकीय सौदेबाजीमुळे पराभव : आदित्यनाथ
पराभवानंतर प्रतिक्रिया देताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही उत्तरप्रदेशच्या जनतेने दिलेला कौल मान्य करतो. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. नागरिकांच्या इच्छेनुसार विजयी उमेदवार राज्याच्या विकासामध्ये योगदान देतील, अशी अपेक्षा आहे. हा निकाल आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे. कुठे कमी पडलो त्याचा आढावा घेऊ. बसप आणि समाजवादी पक्षाचे एकत्र येणे ही राजकीय सौदेबाजी असून, देशाच्या विकासाला बाधित करण्यासाठी ही सौदेबाजी झाली आहे. या आघाडीचा सामना करण्यासाठी आम्ही आमची रणनीती बनवू. राजकीय सौदेबाजी, स्थानिक मुद्दे आणि अतिआत्मविश्‍वास यामुळे आमचा पराभव झाला.