युपीत 6 महिन्यात 431 एन्काऊंटर

0

लखनऊ : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करण्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. योगी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर येथील एन्काऊंटरचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 431 हून अधिक एन्काऊंटर झाले आहेत. म्हणजेच या आकडेवारीनुसार युपी पोलिसांनी 12 तासांमध्ये एक एन्काऊंटर केले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आनंद कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

1106 गुन्हेगारांना पकडले
उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार 20 मार्च ते 18 सप्टेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये 431 एन्काऊंटर झाले. यामध्ये 17 गुन्हेगार मारले गेले. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. एकूण 88 जण या चकमकींमध्ये जखमी झाले. या चकमकींमध्ये एकूण 1106 गुन्हेगारांना पकडण्यात यश आले. दरम्यान, युपी सरकारनेही एन्काऊंटर करणार्‍या पोलिस पथकाला 1 लाख रुपयांपर्यंतचे इनाम जाहीर केले आहे.

आता नागरिक सुरक्षीत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील पोलिस दलाला याबद्दल शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील जनतेला सुरक्षीत असल्याचे वाटत आहे. यापूर्वी पोलिस कारवाई करताना घाबरायचे. आपल्यावरच कारवाई होईल, अशी भीती त्यांना वाटायची. पण आम्हाला हे चित्र बदलले असून पोलिस सक्रिय आहेत, असे योगी यांनी म्हटले होते. मात्र, उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या दोन चकमकींवरुन विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी एन्काऊंटर करणे चुकीचे असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.