युपी यशानंतर भाजप महाराष्ट्रात मध्यावधीसाठी उत्सुक!

0

मुंबई : बहुमतासाठी शिवसेनेची डोकेदुखी सहन करण्यापेक्षा सरळ विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार भाजपच्या श्रेष्ठींनी आरंभला आहे. येत्या राष्ट्रपती निवडणुकीची गरज लक्षात घेऊन जुलै, ऑगस्ट महिन्यात विधानसभा बरखास्तीचा विचार होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या मोदींची लाट पुन्हा उसळली असून, तिचा लाभ घेतल्यास महाराष्ट्रातही स्पष्ट एकहाती बहुमत मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटते आहे. पण जुलै महिन्यात नव्या राष्ट्रपतींची निवड व्हायची असून, त्यात आमदारही मतदार असल्याने भाजपला संयम राखणे भाग आहे.

महाराष्ट्रात दीडशे जागा जिंकण्याची आशा
शिवसेनेसह अन्य पक्षांतील अनेक आमदार भाजपमध्ये यायला तयार असून, त्यांना राजीनामा देऊन निवडून आणण्यापेक्षा सार्वत्रिक निवडणूक लाभदायक असू शकेल.
यावर्षीच्या अखेरीस गुजरात विधानसभेचे मतदान व्हायचे आहे., दरम्यान, हिमाचलचीही निवडणूक व्हायची आहे. अशावेळी अन्य विधानसभांच्या वेळापत्रकाला सुसूत्र ठरेल, अशी मतदानाची वेळ निवडण्याचा विचार होत आहे. उत्तर प्रदेश ज्या सफाईने जिंकला तितकी सफाई दाखवली, तर महाराष्ट्रातही भाजपला 150 हून अधिक जागा स्वबळावर जिंकता येतील. त्यात दोन्ही काँग्रेससहीत मित्रपक्ष शिवसेनेची डोकेदुखी निकालात काढली जाईल, अशी भाजपला आता खात्री झाली आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंडासह गोव्याच्या निकालांचा अभ्यास पूर्ण झाला, मगच याबाबतीत अंतिम निर्णय होऊ शकेल. बहुधा येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात मध्यावधी विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीनंतर पर्रिकर, आदित्यनाथांचा खासदारकीचा राजीनामा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेदेखील खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेत निवडून यावे लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडावी लागते. या काळात खासदारकीचा राजीनामा दिला जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची घाई नाही. आमच्याकडे पोटनिवडणुकीपेक्षा इतरही अनेक गंभीर मुद्दे आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिल्याचे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे.