रावेर शेतशिवारातील घटना ; महसूल प्रशासनाकडून पंचनामा ; भरपाईची मागणी
रावेर– रावेर शेती शिवारात विषारी पाणी पिल्याने 70 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. ही माहिती कळताच महसूल विभाग, वन विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांनी शेताकडे धाव घेत पंचनामा करण्यात आला. मेंढ्या चराईसाठी काही मेंढपाळ कळप घेऊन रावेर शेती शिवारातील विजय महाजन यांच्या शेतात मुक्कामी आले होते. तेथे असलेल्या विहिरीजवळ पाणी प्यायल्याने मेंढ्यांना विषबाधा झाल्याने अहिरवाडी येथील सुकलाल ठोंबरे, मुळा फडकटे यांच्या मालकीच्या सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 70 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या.
महसूल प्रशासनासह अधिकार्यांची भेट
याबाबतची माहीती कळताच तहसीलदार विजयकुमार ढगे गटविकास अधिकारी सानिया नाकाडे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, डी.एस.सोनवणे, हरीलाल पाटील, जितेंद्र पाटील, बिजू जावरे, गणेश रोहिल, सुनील महाजन, हरलाल कोळी, तलाठी प्रवीण वानखडे यांनी घटनास्थळी भेट दिली. डॉ.केखारे, डॉ.किशोर पाटील, डॉ.एस.एम.राठोड, डॉ.आर.के.पाटील, डॉ.संतोष वळजे आदींनी मेंढ्यांवर उपचार केले.