युरोपमध्ये शरिया तलाक मान्य नाही

0

देशात आलेल्या शरणार्थींमध्ये बालविवाह आणि घटस्फोट यांसारख्या समस्यांचा सामना करणार्‍या युरोपीय संघाने (ईयू) शरिया तलाक युरोपमध्ये मान्य करणार नाही, असे सांगितले आहे. जर्मनीनेही असा घटस्फोट देशात मान्य होणार नसल्याचे म्हटले आहे. शरिया या धार्मिक कायद्यानुसार पुरुष आणि महिलांना समान अधिकार प्राप्त नाहीत, त्यामुळे हा कायदा भेदभाव असलेला आहे. त्यामुळे युरोपीय संघाच्या सदस्य देशांमध्ये तो लागू करता येणार नाही, असे लक्झमबर्ग येथील सर्वोच्च युरोपीय न्यायालयाचे महाधिवक्ता हेन्रिक सॉग्मंड्सगार्ड ओए यांनी सांगितले.

सीरियातून आलेल्या आणि जर्मन नागरिकता घेतलेल्या एका जोडप्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर ओए यांनी हे मत दिले. या जोडप्याने 1999 साली सीरियातील होम्स शहरात लग्न केले होते. मात्र, त्यातील पतीने 2013 साली एका धार्मिक न्यायालयासमोर एकतर्फी तलाक घेतला होता. त्याने या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता द्यावी, यासाठी अर्ज केला होता. म्युनिख येथील उच्च न्यायालयाने युरोपीय संघाच्या कायद्याचा हवाला देत ही विनंती मान्य केली होती. मात्र, संबंधित पत्नीने त्याला आव्हान दिले तेव्हा त्या न्यायालयाने युरोपीय न्यायालयात हे प्रकरण पाठवले. त्यावर ओए यांनी अहवाल सादर केला असून, त्यात या घटस्फोटाला मान्यता देण्यास विरोध केला आहे. महाधिवक्त्यांचा हा अहवाल न्यायालयाचा निर्णय नाही. मात्र, सामान्यपणे न्यायालये महाधिवक्त्यांच्या सल्ल्याला होकार देतात.