युवकांना शिवचरित्र, तुकाराम गाथा मार्गदर्शक

0

नवी सांगवीत ओम साई ट्रस्ट, नवनाथ जगताप मित्र परिवार आणि ज्येष्ठ नागरीक संघ यांच्यावतीने शिवकिर्तन
शिवकिर्तनकार गजानन महाराज वाव्हळ यांचे मत

नवी सांगवी : “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जो धारण करतो तोच खरा ‘धारकरी’ होय. आधुनिकतेच्या नावाखाली व्यसन आणि पाश्‍चात्य भोगवादी संस्कृतीकडे आकर्षित होणार्‍या युवकांना परावृत्त करण्यासाठी शिवचरित्र व तुकाराम गाथा मार्गदर्शक ठरेल’’, असे प्रतिपादन शिवकिर्तनकार प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांनी केले.नवी सांगवीतील साई चौक येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ओम साई ट्रस्ट, नवनाथ जगताप मित्र परिवार आणि ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या वतीने आयोजित शिवकिर्तनात ते बोलत होते.

निरूपणात वारकरी दंग
वाव्हळ यांनी ‘तुकोबारायांचे शिवरायांवरील पाईकाचे अभंग’ यावर निरुपण करताना सांगितले की, पाईकाचे सुख पाईकासी ठावे। म्हणोनिया जीवे केलीसाठी। येता गोळ्या बाण साहिले भडीमार ॥ या तुकाराम गाथेतील ‘पाईक’ प्रकरणातील ओवी मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीसी स्वराज्यातील बाराही मावळातील मावळ्यांनी घरादाराचा त्याग करुन उभे रहावे म्हणून समाज प्रबोधन केले. छत्रपतींनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी गनिमी कावा हे प्राचिन युध्द तंत्र तुकाराम गाथेतूनच आत्मसाथ केले. अपना राखोनी ठगावे । आणिका घ्यावे सकळीक हिरोणीया ॥ या ओवीतून प्राचिन युध्द तंत्र तुकाराम महाराज सांगतात. अशा अनेक ओव्यांमधून छत्रपतींचे आणि तुकारामांचे दृढ संबंध निदर्शनास येतात. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीसाठी तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचून समाज प्रबोधन केले.

51 फूट शिवराज्याभिषेक गुढी
पाच जूनला रात्री बारा वाजता एकावन्न फूट उंच शिवराज्याभिषेकाची गुढी उभारण्यात आली. यावेळी भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. नवनाथ जगताप आणि गजानन महाराज वाव्हळ यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन शिवआरती करण्यात आली. तसेच सांगवीतील शिवयोध्दा मर्दानी आखाडाचे प्रमुख प्रतिक वर्‍हाडी आणि युवक, युवतींनी मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, लाठी-काठी, चक्र, आगीच्या बोथाट्यांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर केली. यावेळी शाम जगताप, अमरसिंग आदियाल, पै. गणेश जगताप, विशाल दगडे, गणेश फुलपगार, गणेश शिंदे, डॉ. संतोष तुपे, डॉ. अनिल पाटील, हनुमंत जाधव आदींसह शेकडो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. w