जळगाव । भारत देशांवर जगातील अनेक राष्ट्रांनी आक्रमण केली. या सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. आज युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना नसल्याने त्यांच्यात राष्ट्राभिमान जागविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. ते सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजीत ‘32 मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा’ याविषयांवर बोलत होते. दरम्यान, धर्मप्रार्थनेने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेपूर्वी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. भिडे गुरुजी यांनी पुढे सांगितले की, जो समाज, आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, आत्मसात करत नाही, तो समाज, देश विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावरील सुवर्ण सिंहासन नाहीसे झाले, अशी खंत व्यक्त करीत सिंहासनाची पुर्नस्थापनेची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘ती’ जागा अखंड हिंदुस्थानसाठी पवित्र….
शिवरायांच्या मनाला झालेल्या वेदना पुसून टाकणे व महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे भिडे गुरूजी यांनी स्पष्ट केले. हे सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प 4 जून, 2017 रोजी लाखो धारकर्यांच्या उपस्थितीत रायगडावर घेतला असल्याचे भिडे गुरूजींनी सांगितले. ज्या सिंहासनावर बसून महाराजांचा राज्यभिषेक झाला, ते ठिकाण अखंड हिन्दुस्थानासाठी पवित्र असल्याने राजदरबारात 32 मण सुवर्ण सिंहासन स्थापीत करण्याची गरज भिडे गुरूजींनी यांनी प्रतिपादीत केली.
पोलीसांचा चोख बंदोबस्त
येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाच्या दुतर्फा संभाजी भिडे गुरूजी यांचे भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्याभरातील विविध संघटना, तसेच चळवळीतील कार्यरत पदाधिकारी यांच्यासह गावागावाहून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. ऐतिहासिक गडकोट- किल्ले पारंपरिक मार्गाने पायदळी तुडविणार्या वयाच्या नव्वदीतील तरुणांना लाजवेल अशा आवेशात अनवाणी पावलांनी संभाजी भिडे गुरूजी यांनी सभागृहात प्रवेश केल्यावर जय भवानी जय शिवाजीच्या घोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात संभाजी भिडे यांच्या सभेविषयी होणारा विरोध बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात ठेवण्यात आला होता. सभेची पाहणी पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे यांनी केली.
राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’
आज देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा अभाव असल्याने देश रक्तबंबाळ होत आहे. राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्यामुळे, रक्तात स्वाभिमान, देशाभिमान नसल्याने हिन्दुस्थान दु:खी आहे. देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान जोपर्यंत आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’ आहोत व आपल्या कमकुवतपणाचा फायदा घेत लांडगे देश तोडून खातील. जगात जे जे श्रेष्ठ आहे ते सर्व हिन्दुस्थानात आहे. हिंदु धर्मासारखा धर्म जगात नाही. उदात्त, उत्तुंग, व्यापक सर्व समावेशक धर्माचे आपण पाईक आहोत, याची आठवणही त्यांनी करुन दिली.
सिंहासनासाठी जनतेतून निधी उभारणार
सत्ताधारी भाजप वा अन्य कोणतेही सरकार असो त्यांच्यापासून निधी न घेता लोकसहभागातून जमा करणार सांगत, या कार्याला लोक भरभरून मदत करतील व शिवारायांचे हिंदवी स्वराज्याचे व्रत या माध्यमाने पुर्ण हाईल असे त्यांनी पुढे सांगितले. प्रत्येक तरूणाने रायगडांवर जातांना आधुनिक वेषात न जाता मावळ्याच्या वेषात लाठी शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी. भरकटलेल्या हिंदू समाजाला एकसंघ एकरूप करून एकछत्रात आणून छत्रपतींच्या विचारांचे हिंदू राष्ट्र निर्माण करून त्या अनुषंगाने आपला उद्देश आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.