युवकाचा मित्रासह अपघातात मृत्यू

नवापूरला ट्रक चालकांवर गुन्हा दाखल

नवापूर। अपघातात जखमी झालेल्या भावाला पाहण्यासाठी आलेल्या युवकाचा मित्रासह अपघातात मृत्यू झाल्याची घटना नवापुरात रात्री उशीरा घडली. अपघातात युवक व त्याचा मित्र जागीच ठार झाले. या घटनेमुळे रायपूर गावात शोककळा पसरली आहे. निलेश रमेश गावित आणि लाजरस गावित (रा.रायपूर, ता.नवापूर) असे मयत युवकांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस रवाना केले. अपघातग्रस्त ट्रक व सहचालकाला अटक करण्यात आली. यावेळी जमावाने सहचालकाला बेदम मारहाण केल्यामुळे त्यालाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. नवापूर पोलिसांनी ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करुन सहचालकाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे, नवापूर तालुक्यातील घोडजामणे गावानजीक याकुब गावित यांचा शनिवारी अपघात झाला होता. त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याला पाहण्यासाठी त्याचा भाऊ निलेश गावित आणि त्याचा मित्र लाजरस गावित हे नवापूर रूग्णालयात आले होते. त्यानंतर रुग्णालयातून घरी परत जात असताना सुरतकडून येणार्‍या ट्रकने (क्र.एन.एल.०१-एई ३३१८) वीज महावितरण कंपनीसमोर युवकांच्या दुचाकीला (क्र. एम. एच. ३९ एई ४६७३) जोरदार धडक दिली. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.
रायपूर गावात शोकाकूल वातावरण
नवापूर शहरातील महामार्गानजीक असलेले दुकानदार, नागरिक, युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर दोघांना व्यारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. निलेश गावित याचा रस्त्यातच तर लाजरस गावित याचा उपचार घेतांना मृत्यू झाला. दुपारी निलेश गावित याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. एकाच गावातील दोन युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तसेच रायपूर गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
नवापूर शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूस ६-७ फुट खड्डे करून ठेवले आहे. अरुंद महामार्ग झाल्याने भरधाव वेगात येणार्‍या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीप्रमाणे नवापूर उपजिल्हा रुग्णालयाजवळ व प्रवेशद्वारानजीक गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वीज महावितरण कार्यालयासमोरच मृत्यू
गेल्या काही वर्षांपासून रायपूर येथील निलेश रमेश गावित वीज महावितरण कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होता. त्याच कार्यालयासमोर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.