लोणावळा : सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला. सनी भाळगट (वय अंदाजे 30, रा.गणेशपेठ, पुणे) असे भुशीडॅमध्ये बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा 10 नोव्हेंबर पासून बेपत्ता झाला होता. आज शनिवारी दुपारी भुशीडॅमच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना येथील नागरिकांना आढळला. या घटनेची माहीती लोणावळा शहर पोलिसांना समजताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, जयराज देवकर, जयराज पाटणकर, लखनकुमार वावळे व जीवरक्षक राजू पवार यांनी घटनास्थळी धावघेत मृतदेह पाण्या बाहेर काढला. सनी याच्या खिशातील चिठ्ठी आणि त्याच्या डाव्या हातावर सनी नाव गोंदले होते. यामुळे त्याची ओळख पटली असून, त्याच्या नातेवाईकांनी याबाबत दुजोरा दिला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.