पुणे । पत्नीसोबत बोलत असल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याला डांबून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी दिलीप खडके, दीपक खडके, रवी कांबळे, उदय मारूती कांबळे (सर्व राहणार कोल्हापुर) राहुल पडवळ, अजय आणि अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी आणि दिलीप खडके हे एकाच गावात राहण्यास आहेत. फिर्यादी हा दिलीप खडके यांच्या पत्नीशी बोलत असल्याचा राग त्यांना होता. यातून त्याने सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने फिर्यादीला स्वारगेट येथे बोलावले आणि चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून कोल्हापुरला नेले. तेथे डांबून ठेवून मारहाण केली. फिर्यादीने सुटका करून घेत कोल्हापूरमधील करवीर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी हा गुन्हा खडक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.