हिंजवडी । नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चिंचवड येथील दोघांनी हिंजवडीच्या युवतीला 80 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी राजू चव्हाण व राहुल अनवले या दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रेणू गुप्ता (वय 30, रा. हिंजवडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर 2016 पासून मल्टी अॅक्सेस या कंपनीच्या नावाखाली राजू व राहुल या दोन्ही संशयित आरोपींनी गुप्ता यांना फसवले आहे. नोकरी लावतो, असे सांगत त्यांच्याकडून वेळोवेळी 80 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.