चंद्रपूर: युवतीने चाकूने युवकावर वार करून गंभीर जखमी केले आहे. रात्री च्या वेळेस नागभीड येथील भर रस्त्यावर हा थरार घडला. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला तर झटापटीत युवतीसुद्धा जखमी झाली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नागभीड येथील रेस्ट हाऊसच्या मुख्य रस्त्यालगत संध्याकाळच्या सुमारास एक युवती चाकूने समोरील युवकावर हल्ला करीत असल्याचे निदर्शनास आले. बघता बघता तिथे गर्दी जमली. मात्र कोणीही या युवतीजवळचा चाकू हिसकावण्याची हिंमत करू शकला नाही. ही युवती चाकूने युवकाच्या गळ्यावर वार करीत होती. युवक रक्तबंबाळ झाला होता.
याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवतीला ताब्यात घेतले. पण युवकाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.