युवराजांच्या प्रतीक्षेत शासन निर्णयाची घोषणा लांबणीवर!

0

मुंबई (निलेश झालटे):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अर्थमंत्र्यांनी मुंबई मनपाचा चेक दिल्याने झालेला गोंधळ ताजा असताना आता सेनेच्या मंत्र्यांची हुजरेगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. जवळपास एका महिन्यापूर्वी एम्ब्युलन्ससंबंधी शासन निर्णयाची घोषणा संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी निर्णय होताच करण्याऐवजी दीड महिन्यानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, बुधवारी मंत्र्यांनी न करता ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री यांची शासकीय पत्रकार परिषद जाहीर केली असताना या परिषदेत ते एक शब्द देखील बोलले नाहीत. यावेळी ना. कदम यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते देखील उपस्थित होते. एम्ब्युलन्स सिग्नलमध्ये अडकून रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे सायरनचा आवाज 65 ते 70 डेसीबलवरून 110 ते 120 डेसीबल करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अशी झाली निर्णयाची अंमलबजावणी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विदेशातील धर्तीवर 27 जून 2016 रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र लिहून ऍम्ब्युलन्स सायरनचा आवाज वाढविण्याबद्दल अर्ज केला होता. यानंतर पर्यावरण मंत्र्यांनी 22 सप्टेंबर 2016 रोजी मुख्य सचिवांना यासंबंधात अहवाल देण्याचे सांगितले. केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या परवानगीसह एम्ब्युलन्सचा आवाज 110 ते 120 डेसीबल करण्याचा शासन निर्णय 17 मे 2017 रोजी जाहीर केला. दीड महिना उलटून यासंबंधी कुठलीही माहिती बाहेर आली नव्हती. आज, 5 जुलै रोजी यासंबंधी घोषणा करण्यासाठी ना. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन आपल्या दालनात केले होते. मात्र ऐनवेळी शिवसेनेच्या नव्या ‘शिवालय’ या संपर्क कार्यालयात ही परिषद घेणार असल्याचे सांगितले. या परिषदेत ना. कदम व ना. रावते एकही शब्द बोलले नाहीत.

आदित्य ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश
सिग्नलवर ऍम्ब्युलन्स थांबल्यामुळे रुग्णाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला यश मिळाले आहेत. न्यूयॉर्क, लंडन या विदेशी शहरांच्या धर्तीवर एम्ब्युलन्सचा आवाज 65 ते 70 डेसीबलवरून 110 ते 120 डेसीबल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यामुळे एका सिग्नलवरून किमान दुसऱ्या सिग्नलपर्यंत तरी सायरनचा आवाज पोहोचणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने वाहतुकीची सोय केली जाऊ शकणार आहे.