नवी दिल्ली । पुढील महिन्यात भारतात 17 व्या 17 वर्ष गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा बिगुल वाजेल. ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो म्हणाला की, 1997 मध्ये 17 वर्ष फिफा विश्वचषक स्पर्धे जिंकल्यानंतर त्याच्या चमकदार कारकिर्दीची चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा खूपच महत्वाची आहे. रोनाल्डिन्होने 20 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये ब्राझिलला पहिल्यांदा 17 वर्षे गटाचा फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. 17 वर्ष ेगटाचा फिफा विश्वचषक (1997) आणि 2002 मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणारा रोनाल्डिन्हो फुटबॉल जगतातला एकमेव खेळाडु आहे.
17 वर्षे फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या एकुण 12 फुटबॉलपटूंनी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. सन 2004 आणि 2005 मध्ये फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेला रोनाल्डिन्हो म्हणाला की, 17 वर्ष गटाचा फिफा विश्वचषक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा विश्वचषक जिंकल्यावर माझ्यासाठी व्यावसायिक फुटबॉलचे दरवाजे उघडले. मी केवळ या स्पर्धेत खेळलो नाही, तर ती स्पर्धाही जिंकली हे माझे भाग्य आहे. प्रामाणिकपणे सांगतो या स्पर्धेमुळे माझा व्यावसायिक खेळाचा मार्ग मोकळा झाला. एका संकेत स्थळाने रोनाल्डिन्होच्या बोलण्याचा संदर्भ देत सांगितले की, 17 वर्ष गटाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात होते. मोठी कामगिरी करण्याचे स्वप्न युवा खेळाडू बघत असतात. ही स्वप्ने साकारण्याची चांगली संधी या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना मिळते. या स्पर्धेमुळेच माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली असल्यामुळे स्पर्धेला माझ्या व्हृदयात कायम स्थान असेल.