फैजपूर । कला हि मानवाला मिळालेली अद्भूत देणगीच जणू व्यक्तीमत्वाला वेगळा आयाम देणारी आहे. या कला सादरीकरणाचे भव्य व्यासपीठ म्हणजेच युवारंग या माध्यमातून युवकांना आपल्या विविध कलागुणांना सादरीकरण करता येत असल्याने तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकसीत होत असल्याचे प्रतिपादन उमवि व्यवस्थापन समिती सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष प्रा. दिलीप पाटील यांनी केले. येथील धनाजी नाना महाविद्यालयात उमवि परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 19 ते 23 जानेवारी दरम्यान युवारंग महोत्सवाचे आयोेजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते पुढे बोलताना प्रा. पाटील म्हणाले की, युवारंग उमवि परिक्षेत्रातील विविध कलाप्रकारातील कलाकारांना कलेची उधळण करण्याचे व्यासपीठ म्हणजे युवारंग दरवर्षीप्रमाणे युवारंगचे आयोजन मोठ्या उत्साहात विविध महाविद्यालयांमध्ये केले जाते.
विविध कला प्रकारांसाठी सहा रंगमंच
या वर्षी धनाजी नाना महाविद्यालयास हा मान मिळाला असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. युवारंगसाठी लागणारे मनुष्ययबळ, सोयी- सुविधा आणि नियोजनासाठी महाविद्यालयाची पुरेपुर खबरदारी घेवून कार्यक्रमांसाठी सहजता दर्शविली आहे. युवारंगच्या कलाप्रकारात समुहनृत्य, समुहगाययन, मुकनाट्य, बिडंबननाट्य, मिमिक्री, शास्त्रीय वाद्य व गायन, कोलाज, रांगोळी, चित्रकला आदींसाठी समर्पक एकूण सहा रंगमंच तयार केले असून त्यासाठी लागणार्या आवश्यक बाबींची पुर्तता केली आहे. तसेच आवश्यक बाबींमध्ये वसतीगृहे, दळणवळण, सादरीकरण, आरोग्यदायक पाणी, अन्न व वैद्यकिय सुविधा आदींची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली.
भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तरुणांमध्ये
याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्याची क्षमता जशी तरुणांमध्ये आहे तशीच आनंददायी समाज तयार करण्याची उर्मीसुध्दा तरुणांमध्येच आहे. तरुणांच्या कलाविष्काराला समर्पक दिशा आणि प्रोत्साहन मिळाले तर जगाचे डोळे दिपवून टाकण्याची क्षमता असलेले विद्यार्थी आपल्याच मातीत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील यांनी सांगितले की, युवारंग म्हणजेच महाविद्यालयाला लाभलेली वैभवशाली परंपरा आणि व्यवस्थापक मंडळ, प्रशासन, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या जबाबदारीची जाणीव हि महाविद्यालयाची ताकद आहे. युवारंग 2016 च्या यशाबद्दल यत् किंचितही शंका नसून कलाविष्काराच्या त्रिवेणी संगमाला नवीन उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी असल्याची भावना व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
सोमवार 16 रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत उमवि व्यवस्थापन समिती सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष प्रा. दिलीप पाटील, मार्गदर्शक प्रा. सत्यजित साळवे, जनसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल पाटील, प्रा. राजेश बागुल, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, युवारंगचे समन्वयक डॉ. प्रा. अनिल भंगाळे, उपप्राचार्य ए.जी. सरोदे, डॉ. उदय जगताप, डॉ.डी.बी. तायडे, प्रा.राजेंद्र राजपूत, प्रा.टी.एम. सानसाकडे, प्रा.डॉ. कल्पना पाटील
उपस्थित होते.
1 हजार 667 जणांची नोंदणी
यामध्ये 93 महाविद्यालय सहभागी झालेले असून 797 विद्यार्थी, 514 विद्यार्थीनी असे एकूण 1 हजार 311 विद्यार्थी आहेत. संघ व्यवस्थापक म्हणून 152, संगीत साथीदार 203 असे एकूण 1 हजार 667 जणांची नोंदणी करण्यात आलेली आहे.