सेनेची मंगळवारी कार्यकारणी निवडणूक
मुंबई :- शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मंगळवारी वरळीच्या एनएससीआय येथे होणार आहे. या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत अतिशय महत्वाचे असलेले नेतेपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही नेतेपदी बढती मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी होणाऱ्या निवडणुकीत विविध पदांसाठी मतदान होऊन नवीन कार्यकारणी घोषित केली जाईल. पण सर्वांना उत्सुकता आहे ती कुणाला बढती मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याचीच. यासंदर्भात सोमवारी मातोश्रीवर एक तातडीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठाला शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व पक्षांना दर पाच वर्षांनी निवडणूक घेऊन त्यांची पक्षांतर्गत कार्यकारिणी जाहीर करावी लागते. त्यानुसार शिवसेनेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख ते सचिव पदापर्यंत मतदान होणार आहे. आदित्य आणि शिंदे यांना बढती मिळत असताना मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नेतेपदावरून सल्लागारपदी नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या पक्षांतर्गत कार्यकारणीत सर्वात प्रथम शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी मतदान होईल. मात्र या सर्वोच्च पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुणीच उमेदवार नसल्याने ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोधच होणार हे निश्चित मानले जात आहे. अशीच परिस्थिती युवासेना प्रमुखपदासाठी देखील आहे. मात्र यात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचे युवासेना प्रमुख आदित्य यांची शिवसेना नेतेपदासाठी बढती होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेनेची सूत्रे कोणाकडे द्यायची यावरून पक्षात त्यावेळी खूप मोठे वादळ उठले होते. तसे यापुढे होऊ नये, याची पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. युवासेनेचे प्रमुखपद दिल्यानंतर आता नेतेपद देऊन आदित्य यांना भविष्यात कोणताही दगा फटका होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या कार्यकारणीत काही महत्त्वाचे बदल होण्याची अपेक्षा आहे. या बदलांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील प्रतिनिधींना बढती मिळणार असल्याचे सांगितले जाते.