खासदार सुप्रिया सुळे यांचे मत : शरद युवा महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ
इंदापूर : शरद युवा महोत्सव कार्यक्रमातील वैयक्तीक गायन स्पर्धेत विशेष कामगिरी करणार्या युवा कलाकारांना भविष्यात मोठे व्यासपीठ उलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. इंदापूर येथील पवार पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित शरद युवा महोत्सवाच्या बक्षिस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, अभिजीत तांबीले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पुन्हा जोमाने तयारीला लागा
स्पर्धेतील विजेत्यांना सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. विजेत्या कलाकारांनी जास्त हुरळून जाऊ नये व ज्यांचा नंबर आला नाही त्यांनीही नाराज होऊ नये. पुढील वर्षासाठी पुन्हा जोमाने तयारीला लागावे. या महोत्सवात विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादन करणार्या कलाकारांसाठी भविष्यात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले. महारूद्र पाटील, प्रताप पाटील, वर्धमान शहा, अशोक घोगरे, अमोल भिसे, वसंतराव आरडे याप्रसंगी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी वाजवला ढोल
या महोत्सवांतर्गत ढोल ताशा स्पर्धा नगरपरीषद मैदानावर पार पडली. खासदार सुप्रिया सुळे यांनी ढोल ताशा स्पर्धा कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी ढोल ताशांचा गगनात घुमणारा आवाज व युवक युवतींचा ढोल वाजविण्याचा उत्साह पाहून सुप्रिया सुळे यांना देखील राहावले नाही. त्यांनी स्पर्धेतील ढोल कमरेला बांधून मनसोक्तपणे ढोल वाजविण्यास सुरूवात केली. सुळे यांचा उत्साह पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जनतेतील लोकप्रतिनीधी कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण सुळे यांच्या रुपातून इंदापूरकरांना अनुभवायला मिळाले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या ढोल वादनाला दाद दिली.