नवी दिल्ली : 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकपसाठी ‘खेलियो’ हा ढगाळ बिबट्या शुभंकर असणार आहे. 6 ते 28 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. भारतात पहिल्यांदाच होणार्या ‘फिफा’च्या स्पर्धेला 237 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार या सोहळ्यात ‘खेलियो’चे अनावरण करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री विजय गोयल आणि अ. भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. ढगाळ बिबट्या ही प्रजाती अतिशय दुर्मीळ होत असून या निमित्ताने लोकांना त्याची माहिती व्हावी, म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.
प्रमुख प्रशिक्षकांची लवकरच नियुक्ती
दरम्यान, भारताच्या 17 वर्षांखालील संघासाठी प्रमुख प्रशिक्षकांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. वर्ल्डकपसाठी फक्त 9 महिन्यांचा कालावधी राहिला असताना फुटबॉल महासंघाने निकोलाई अॅडम यांची हकालपट्टी केल्याने आता युद्धपातळीवर नव्या प्रशिक्षकांचा शोध सुरू आहे. त्यासाठी माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि अभिषेक यादव यांची मदत घेतली जात आहे. जर्मन फुटबॉल महासंघाच्या शिफारशीवरून दोन वर्षांपूर्वी अॅडम यांनी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अॅडम आमचा शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार खेळाडूंनी पटेल यांच्याकडे केली होती. ‘खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात चांगला संवाद आवश्यक असते; मात्र अॅडमविरुद्ध नाराजी असल्याने आम्हाला दुसरा पर्याय नव्हता, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.