पिंपरी-चिंचवड : ’कमवा व शिका’ ही महाराष्ट्र राज्याची योजना तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाची ’राष्ट्रीय क्षमता वृद्धी मिशन’च्या माध्यमातून भारतभर तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी 16 हजार तरुणांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ’ऑन जॉब’ ट्रेनिंगच्या माध्यमातून नामांकीत कंपन्यांमध्ये पाठवून त्यांचे कौशल्य विकसित करण्याचे काम युवा शक्ती फाउंडेशनने केले आहे, असे मत युवा शक्ती फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
युवा शक्ती फाउंडेशनच्या ’स्किल डेव्हलपमेंट’च्या आढावा बैठकीचे पिंपरीत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. युवा शक्ती फाउंडेशनचे संचालक विक्रमादित्य पवार, सतीश पवार, टाटा मोटर्सचे माजी मनुष्यबळ विकास अधिकारी व कायदेशीर सल्लागार अॅड. आर. एन. निर्मल, संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व देशातील वेगवेगळ्या विभागातील कौशल्य विकासाचे काम सांभाळणारे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
12 शाखांद्वारे उपक्रम सुरू
युवा शक्ती फाउंडेशनच्या ’स्किल डेव्हलपमेंट’ उपक्रमांतर्गत गेल्या 11 वर्षांपासून सांस्कृतिक मनुष्यबळ सेवा, ट्रेनिंग तसेच प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू आहे. प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागातील तरुणवर्गाला रोजगार कौशल्य प्रशिक्षण व नोकरी मार्गदर्शन प्रदान करणे तसेच व्यावसायिक विकासावर प्रशिक्षण देणे या माध्यमातून काम सुरू आहे. संस्थेच्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकूण 12 शाखांच्या माध्यमातून रोजगार व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम चालू आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बागेला यांनी केले. प्रदीप कदम यांनी आभार मानले.