बार्सिलोना । अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीगच्या नव्या मोसमाची सुरुवात विजयाने केली. लीगमधील पहिल्या सामन्यात बार्सिलोनाने युव्हेंट्सचा 3-0 असा पराभव केला. मेस्सीने केलेले दोन गोल या सामन्यात महत्त्वाचे ठरले. पहिल्या हाफमध्ये अथक परिश्रम घेत मेस्सीने 45 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर दुसर्या हाफमध्ये इव्हान रेकिटिकने 56 व्या मिनिटाला दुसरा गोल करून बार्सिलोनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. युव्हेंटसविरुद्ध आपला बचाव भक्कम ठेवताना मेस्सीने 69 व्या मिनिटाला तीसरा गोल केला आणि स्पेनच्या या क्लबने 3-0 अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. मेस्सीने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत आतापर्यंत एकुण 27 संघाविरुद्ध गोल केले आहेत. मेस्सीच्या जोडीने अन्य तिघांनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, ज्लातान इब्राहिमोविक आणि करिम बेंजेमाने अशी कामगिरी केली आहे.
याआधी मेस्सीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बार्सिलोनाने एस्पानयॉलचा 5-0 असा धुव्वा उडवत लीग फुटबॉल स्पर्धेत आघाडीवर दोन गुणांची बढत मिळवली होती. दुसरीकडे रेआल माद्रिदला निलंबित केलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची उणिव भासली. या सामन्यात गॅरेथ बेलने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्याचा फटका रेआल माद्रिदला बसला होता.