मुंबई । पहिल्या मोसमापासूनच समस्त देशवासीयांवर आपली मोहिनी टाकणार्या प्रो लीग कबड्डीच्या पाचव्या सत्रातील सामन्यांना 28 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यावेळी स्पर्धेत आणखी दोन संघाची भर पडल्यामुळे कबड्डीप्रेमींना आता दीड एक महिना या खेळाची मेजवानी लुटता येईल. वाढलेले संघ आणि खेळाडू बदलल्यामुळे यंदाचा विजेता कोण याबद्दल निरनिराळी भाकिते वर्तवली जात आहेत. कोणाची पसंती पहिल्या मोसमात विजयी ठरलेल्या जयपूर पिंक पॅथर्सला आहे तर कोणी पाटणा पायरेट्स संघाची भक्कम दावेदारी असल्याचे सांगत आहे. या चर्चेत पटकन एखादा यु मुंबाचे नाव घेतो. दुसर्या सत्रात विजयी ठरलेल्या यु मुंबाला नंतरच्या सत्रांमध्ये स्पर्धेच्या अंतिम सामन्याने कायम हुलकावणी दिली. दोनदा उपविजयी आणि एकवेळ विजयी ठरलेल्या यु मुंबाची चौथ्या सत्रात खूपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यामुळे विजेतेपदाचा दुष्काळ यंदाच्या सत्रात संपुष्टात आणण्याच्या इर्ष्येनेच मैदानात उतरेल.
संघाची ताकद
प्रशिक्षक ई भास्करन यांनी आखलेली रणनिती प्रत्यक्ष मैदानात अत्यंत प्रभावीपणे अमलात आणणार्या कर्णधार अनुपकुमारला संघाच्या यशाचे श्रेय दिले जाते. अनुपकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे अंत्यत शांतपणे तो आघाडीला राहून संघाचे नेतृत्व करतो. अर्जुन पुरस्कार विजेता असलेल्या पहिल्या दिवसापासून यु मुंबा संघाशी जोडला गेला आहे. संघाचे प्रशिक्षक इ. भास्करन आणि रवि शेट्टी यांना संघातील प्रत्येक खेळाडूच्या कमकुवत आणि जमेच्या बाजू माहीत आहे.
कोणाचा वापर कधी आणि कसा करायचा याचा त्यांचा स्वत:चा आरखडा तयार असतो. यावेळी संघात अनेक नवीन खेळाडू असल्यामुळे संघाची रणनीतीही नवीन असणार हे निश्चितच आहे. मागील हंगामात पाटणा पायरेट्सकडून खेळणार्या कुलदीप सिंगने चढाईंमध्ये सुमारे 82 गुण मिळवलेले आहेत. कुलदीपकडूनही भास्करन आणि रवी शेट्टी यांना आक्रमक खेळाची अपेक्शा असेल. कुलदीपच्या या कामगिरीमुळे यु मुंबाने त्याला आपल्या संघात घेतले. याशिवाय शब्बिर बापू आता संघात परतला आहे.
संघाची वाटचाल
लीगच्या पहिल्या सत्रातील अंतिम सामन्यात जयपुर पिंक पँथर्स संघाकडून परभूत झाल्यामुळे यु मुंबाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसर्या सत्रात या संघाने स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली. प्रतिस्पर्धी संघाना अनपेक्शित धक्के देत यु मुंबाने त्यावेळी विजेतेपद मिळवले. दुसर्या सत्रातील कामगिरीची पुनरावृत्ती यु मुंबाने तिसर्या सत्रातही केली, पण निर्णायक लढतीत पाटणा पायरेट्स संघाने त्यांचे सलग दुसर्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न प्रत्यक्शात येऊ दिले नाही. चौथ्या सत्रात मात्र यु मुंबाच्या खेळाडूंनी चाहत्यांची सपशेल निराशा केली. त्यामुळे गेल्यावेळी मिळालेली नामुष्की टाळण्याचा प्रयत्न खेळाडू करतील.
संघात झालाय बदल
यावेळी झालेल्या लिलावामुळे इतर संघाप्रमाणे यु मुंबाच्या संघातही नवीन चेहरे पाहायला मिळणार आहे. यावेळी यु मुंबाच्या संघव्यवस्थापनाने फक्त कर्णधार अनुपकुमारला कायम ठेवले होते. या संघात आता जोगिंदर नरवाल, सुरेंद्रसिंग, डी सुरेशकुमार, दीपक यादव, एन्जेरिथ हे बचावपटू असतील, तर काशिलींग आडके, नितीन मदने, शब्बिर बापू, अनुपकुमार, दर्शन, श्रीकांत जाधव, मोहन रमण यांच्यावर आक्रमणाची संघाची भिस्त असेल. कोरियाचे दांग जू हॉग आणि योगजु ओके, इराणचा हदी ओशोरोरॅक, कुलदीप सिंग, शिव ओम, ई सुभाष हे संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत.
1 चढाईपटू शब्बीर बापू परतल्यामुळे यु मुंबाची ताकद वाढली आहे. संघात अनेक नवीन खेळाडू असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाना अनपेक्षित धक्के मिळण्याची शक्यता आहे.
2 प्रशिक्षक इ. भास्करन यांना संघातील प्रत्येक खेळाडूची नेमकी ताकद काय आहे हे माहीत आहे. त्यामुळे मोठ्या कल्पकतेने ते आवश्यक असताना खेळाडूंचा वापर करतात.
3 लीगचे चौथे सत्र हे यु मुंबासाठी एक दु:खद स्वप्नासारखे होते. या सत्रातील अपयश मागे टाकून पुन्हा नवीन उभारी घेण्याची रणनीती संघव्यवस्थापनाने आखली आहे.