मुंबई । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्हासनगर येथील प्रांजल पाटील हिने घवघवीत यश संपादन करुन आपल्या अंधत्वावर मात करीत 124 वा क्रमांक मिळवला आहे.
उल्हासनगरमध्ये राहणारी प्रांजल पाटील ही दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएचडी करीत होती. 2016 मध्ये तिने यूपीएससीच्या परीक्षेत 773 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. प्रांजलच्या या यशाची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली असून नोकरी देण्याचे आश्वासन ही दिले होते. मात्र रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता तुम्ही शंभर टक्के दृष्टीहीन असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने देऊ केलेली नोकरी नाकारत आहोत असे सागण्यात आले.
प्रांजलला रेल्वेऐवजी अधिक चांगल्या पदाची नोकरी देण्यात येईल असे सांगितले. मात्र प्रांजलने आपला लढा सुरु ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर फरिदाबाद येथे पोस्ट आणि टेली कम्युनिकेशन येथे तिची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही भारतीय प्रशासकीय सेवेचे स्वप्न पाहणार्या प्रांजलने आपला अभ्यास सुरुच ठेवला. त्यात तिला अखेर यश आले असून यंदाच्या परीक्षेत प्रांजलने 124 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. याबाबत प्रांजल पाटील हिच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत तिचे वडील एल.बी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की यूपीएससी परीक्षेत पास झाल्याने तिचे स्वप्न साकार झाले असून त्यांचा आनंद आम्हा सर्वाना झाला आहे.