यूपीएससी परीक्षेला बसू न दिल्याने तरुणाची आत्महत्या

0

नवी दिल्ली-युपीएससी किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसू न दिल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. नवी दिल्लीतल्या राजेंद्र नगरमध्ये राहणाऱ्या २८ वर्षांच्या वरूणने आत्महत्या केली आहे. त्याच्या घरातून एक चिठ्ठी मिळाली असून त्यात म्हटले आहे. ‘नियम असण्यात काही चूक नाही, परंतु सहानुभूतीने काही विचार तर करायला हवा.

परीक्षेला उशिरा पोहोचला 

या स्पर्धा परीक्षांची प्राथमिक फेरी काल ३ जून रोजी रविवारी पार पडली. यावेळी काही कारणांमुळे त्याला परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात आला आणि परिणामी त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे. राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता व परीक्षेची तयारी करत होता. रविवारी तो परीक्षा देण्यासाठी पहाडगंज येथील केंद्रावर गेला. परंतु त्याला जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. निराश झालेल्या या तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. युपीएससीच्या नियमांप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर येणे अपेक्षित आहे. या वेळेत न पोचल्यास प्रवेश दिला जाणार नाही असे हा नियम सांगतो.

विद्यार्थी विविध कारणांसाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना काही प्रकरमांमध्ये दिसले आहेत. परंतु साधारणपणे अपयशी झाल्याने असे प्रकार घडतात आणि या बाबतीत परीक्षा देता आली नाही म्हणून आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यप्रदेशमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये आठ विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. अपेक्षेइतके गुण न मिळाल्यामुळे नैराश्यापोटी आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यात आले.