बरेली-उत्तर प्रदेशमधील बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनीच अत्याचार केला आहे.
भमौरा गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने तिला बदायूं रोडला असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलीवर उपचार सुरू असताना रुग्णालयाचे काही कर्मचारी आयसीयूमध्ये शिरले. तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. कर्मचाऱ्यांनी तिला एक इंजेक्शन दिल्यामुळे तिची शुद्ध हरपली. तसेच मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. दोन्ही हाथ आणि पायही बांधले आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला.
मुलीने हा धक्कादायक प्रकार कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तोंडावर मास्क असल्याने ती नीट सांगू शकली नाही. आयसीयूतून बाहेर आल्यावर पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार सांगितला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्यानंतर तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. तसेच मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.