अलाहाबाद : वृत्तसंस्था –उत्तरप्रदेशातील अलाहाबादमधील त्रिवेणीपुरमयेथे शुक्रवारी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. तसेच सिद्धार्थनगरमधील गोहानिया येथे एका पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी लोकांनी केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात महत्त्वाचा बदल करण्याच्या सूचना उत्तरप्रदेश सरकारने नुकत्याच दिल्या आहेत. भीमराव आंबेडकर असे नाव लिहिण्याऐवजी यापुढे भीमराव रामजी आंबेडकर असे संपूर्ण नाव लिहिण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर ही घटना घडली आहे.