लखनऊ: उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवची काल हत्या करण्यात आली होती. या हत्येचे रहस्य उलगडले आहे. रमेशच्या आईनेच त्याची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा, म्हणून त्याची हत्या केल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. अभिजीतच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आईने दिली आहे.
रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह काल रविवारी हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला. या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आला. त्यावेळी आपल्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यावर अभिजीत झोपला. सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला, अशी माहिती यादव परिवाराकडून पोलिसांना देण्यात आली.
अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. अभिजीतची आई आणि मोठ्या भावाची कसून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.