यूपी सरकारची भूमिका दलितविरोधी?

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर योगी आदित्यनाथ सरकारची दलित विरोधी प्रतिमा बनण्याच्या शक्यतेने भाजपचे केंद्रीय नेतृत्व चिंतेत आहे. जर आदित्यनाथ यांनी पक्षाची किंवा स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी योग्य पाऊल न उचलल्यास त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला जाईल, असा इशारा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिध्द केले आहे.

सहारनपूरमधील शब्बीरपूर गावात पाच मे रोजी दलित आणि ठाकूर समाजात हिंसाचार झाला होता. यात एका ठाकूरचा मृत्यू झाला होता आणि दलितांची किमान दोन डझनहून अधिक घरे आणि त्यांचे पीक जाळण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरात अशाप्रकारच्या हिंसेच्या अनेक घटना घडल्या. योगी आदित्यनाथ हे स्वत: ठाकूर असल्याने ते ठाकूरांना वाचवत असल्याचा आरोप इथल्या दलित समाजाकडून केला जात आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने सहारनपूर हिंसाप्रकरण योग्यरितीने न हाताळल्यामुळे हे प्रकरण चिघळत गेल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते, असे त्या वृत्तात म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांना प्रशासनाचा अनुभव कमी असल्यामुळे असे होत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. हा हिंसाचार दुसर्‍या जिल्ह्यात पसरला नाही पाहिजे, अशी ताकीद पक्षाने आदित्यनाथ यांना दिल्याचे भाजपच्या एका सूत्राने सांगितलंय.

5 मे रोजीच्या हिंसेनंतर भीम आर्मी नावाच्या दलित संघटनेने 9 मे रोजी सहारनपूरमधील हिंसेविरोधात आंदोलन केले. 23 मे रोजी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या बैठकीवरून परतणार्‍या दलितांवर हल्ला करण्यात आला होता. यात अनेकजण जखमी झाले होते. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून आदित्यनाथ यांनी राज्याचे गृह सचिव मणीप्रसाद मिश्रा आणि महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आदित्य मिश्रा यांना दलित आणि ठाकूर यांच्या घरी पाठवले होते. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेते शब्बीरपूरजवळील गावांमध्ये जाऊन दलित आणि ठाकूर यांच्याबरोबर बैठका घेत आहेत. योगी सरकारने शब्बीरपूर गावात कोणत्याही नेत्याची बैठक किंवा सभा आयोजित करण्यास बंदी घातली आहे.