मुंबई – घाटकोपरमध्ये काल झालेल्या विमान दुर्घटनेनंतर ‘यूवाय’ कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. घाटकोपरमध्ये ‘यूवाय’ कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीचा अनुभव फक्त चार वर्षाचा आहे. या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विमानसेवा देण्याचा ठेका दिला होता. त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री विमान अपघातातून वाचले. नंतर याच कंपनीचे विमान काल कोसळले आहे. उत्तरप्रदेशचे भंगार खरेदी करुन एखादी विमानसेवा कोण चालवत असेल तर हा विषय गंभीर आहे. या अगोदरच्या अपघाताची चौकशी का झाली नाही असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री चोरुन- चोरुन व्हीआयपी कल्चर आणताहेत
नरेंद्र मोदी देशामध्ये ढिंडोरा पिटत आहेत की देशामध्ये व्हिआयपी कल्चर संपलं आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री आपल्याच कार्यकर्त्यांना चोरुन-चोरुन मंत्रीपदाचा दर्जा देत व्हीआयपी कल्चर आणत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. देशातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी मंत्र्यांचा लाल दिवा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लालदिव्याशिवाय मंत्री फिरत आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देत आहेत. सिध्दीविनायक मंदिराच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनाही मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.भाजपचे हे वेगळं चारित्र्य आहे. व्हिआयपी कल्चर संपवण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना चोरुन चोरुन आपल्या लोकांना व्हीआयपी बनवत आहे. यावरुन देशाच्या जनतेसमोर भाजपचा असली चेहरा समोर आला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.