ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले ठाणे शहराजवळील येऊरचे जंगल अनेक वर्षे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून येऊर जंगलात मद्यपींचा वावर वाढल्याच्या स्थानिकांच्या तक्रारींत वाढ झाली आहे. श्रावणसरी बरसण्याआधी साजर्या केल्या जाणार्या गटारीचे निमित्त साधत शेकडो तळीराम पर्यटक गटागटाने येऊरकडे मोर्चा वळवतात. दारू पिऊन, मोठमोठ्या आवाजात कारमध्ये गाणी लावून गटारीचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून येऊरमध्ये सुरू झाला होता. त्यामुळे येऊर जंगलामध्ये येणार्या मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागासोबत ‘येस’ (येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटी) संस्थेच्या ‘ग्रीन गटारी’ उपक्रमातंर्गत विविध संस्था सहभागी झाल्या आहेत ‘येस’ संस्थेला ‘मतदार जागरण अभियान’ व ‘ठाणेकर्स’ या दोन संस्थांची मदत मिळाली आहे. त्यामुळे येऊरमध्ये गटारी साजरी करणार्या मद्यपी जबरदस्त धक्का बसला आहे. तसेच येऊरच्या पायथ्याशी वनविभागासह वर्तकनगर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्यात आली. तसेच मद्य आढळणार्या चालकांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
विविध संस्थांचा उपक्रम
ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून या भागात ग्रीन गटारी उपक्रम राबवत आहेत. या माध्यमातून जनजागृती करणे, मद्यपींची माहिती पोलिसांपर्यंत पोहचवणे आणि रोप लागवड केली जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने ही सामाजिक संस्था वन विभाग, पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाला पत्र देऊन या भागातील मद्यपान थांबवा, अशी विनंती करत असते. रविवारीही संस्थेच्या पदाधिकार्यांनी पोलिसांच्या मदतीने येऊरमध्ये विशेष मोहीम राबवून येऊर दारुमुक्त करण्यासाठी विशेष सहभाग घेतला.
सुरक्षा वाढवा
मुंबई, ठाण्यातील तळीराम पर्यटकांच्या पार्ट्यांसाठी हक्काचे ठिकाण म्हणून येऊर प्रसिद्ध आहे. येऊरच्या जंगलांमधील धबधब्यांवर येणार्या तरुणांवर अंकुश ठेवणारी कोणतीही ठोस यंत्रणा या भागात नाही. वनविभागातर्फे भेंडीनाला येथील धबधब्यांजवळ संरक्षित भिंत बांधण्यात आली असली तरीही धबधब्यात ओल्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी तरुण गर्दी करतात. गटारीच्या निमित्ताने या भागात गस्त घालून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.