येडियुरप्पा मंत्रीमंडळाच्या शपथविधीवर स्थगिती नाही

0

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बी.एस. येडियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. रात्रभर चाललेल्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची शुक्रवारी सकाळी साडेदहाला पुन्हा सुनावणी होणार आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी काल सायंकाळी येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्यानंतर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतला. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत सुप्रीम कोर्टातील न्यायालय क्रमांक सहामध्ये एके सिकरी, एसए बोबडे आणि अशोक भूषण या तीन न्यायाधिशांच्या बेंचच्या पीठाने तातडीने सुनावणी सुरू केली. काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी येडियुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र आपण कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला स्थगिती देऊ शकत नाही. तसेच कोणत्याही राज्यपालाला याबाबत निर्देश देऊ शकत नाही असे सांगत स्थगितीला नकार दिला. तथापि, येडियुरप्पा यांनी राज्यपालांना आमदारांच्या पाठींब्याची दिलेली चिठ्ठी आपल्याकडे सोपवावी असे निर्देश दिले. यावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्यामुळे आज सकाळी नऊ वाजता येडियुरप्पा मंत्रीमंडळाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.