येडीयुरप्पांच्या राजीनाम्याने २२ वर्षापूर्वीची आठवण ताजी झाली

0

बंगळूर-कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वीच शनिवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा अवघ्या तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले असून कर्नाटकमधील या घटनाक्रमाने १९९६ मधील आठवणी ताज्या झाल्या आहेत. २२ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक मत कमी पडल्यावर घोडेबाजार न करता नैतिकतेला प्राधान्य देत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

दोन नेत्यांमधला फरक

शनिवारी दिवसभर येडियुरप्पा हे वाजपेयींचे अनुकरण करतील का, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर वाजपेयी यांच्याप्रमाणेच येडियुरप्पा यांनी देखील राजीनामा देणेच पसंत केले. वाजपेयींनी नैतिकतेला प्राधान्य दिले असले तरी येडियुरप्पा यांनी मात्र सर्वतोपरी प्रयत्न केले. पण यात ते अपयशी ठरले. यावेळी एकाच पक्षातील दोन नेत्यांमधला फरकही लक्षात येतो.

१९९६ मध्ये असे झाले 

बाबरी मशीद विध्वंसाच्या चार वर्षानंतर देशात १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत भाजपा १६१ जागा जिंकून लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेसकडे १४० खासदारांचे पाठबळ होते.

त्यामुळे प्रादेशिक पक्ष आणि डाव्या पक्षांकडे सत्तेच्या चाव्या होत्या. तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी वाजपेयींना सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रपतींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी वाजपेयींना २ आठवड्यांचा कालावधी दिला. भाजपाने प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर १३ दिवसांनी बहुमत चाचणीपूर्वी लोकसभेत अटलबिहारी वाजपेयींनी राजीनामा दिला. योगायोग म्हणजे त्यानंतर काँग्रेस व अन्य पक्षांच्या पाठिंब्यांवर पंतप्रधानपदी कर्नाटकचेच एचडी देवगौडा विराजमान झाले.