मुंबई । जे येतील त्यांच्यासोबत जाऊ, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय जाऊ. मात्र, काँग्रेससोबत कधीही एकत्र जाणार नाही, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले आहे. भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला. मुंबईतील नरीमन पॉइंट येथे झालेल्या विजयोत्सवात त्यांनी हे वक्तव्य केले. राज्याचे प्रदेश कार्यालय मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विविध मंत्र्यांची उपस्थिती होती. मुंबईत सर्व समाजाने भाजपला मतदान केले. भाजपचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले, असे ते म्हणाले. जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
आव्हानांचा सामना करण्याकरता ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही महाराजांना प्रार्थना केली. असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष केवळ लाटेवर निवडून आला असे म्हटले होते. परंतु ही लाट विश्वासाची लाट आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही लाटेवर निवडून आलो नाहीत असे त्यांनी म्हटले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असे त्यांनी म्हटले. राज्यासमोर अनेक आव्हाने आणि आपण त्या आव्हानांचा सामना योग्य रितीने करत आहोत असे त्यांनी म्हटले. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जनता मोदींच्या पाठीमागे राहिले असे ते म्हणाले. आपण काँग्रेससोबत जाणार नाही, नाही, नाही म्हणजे नाही असे ते यावेळी म्हणाले. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांच्या मेहनतीमुळेच भाजप विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले.