पुणे : येत्या तीनदिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचे कमबॅक होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शेतकर्यांना दिलासा
बिहार-उत्तर प्रदेशात पावसाचे थैमान सुरु असताना महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे. मराठवाड्यात तर भीषण परिस्थिती असून शेतकरी देशोधडीला लागतो की काय, अशी स्थिती आहे. विदर्भात तहानलेला आहे. पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातही जमीनीला भेगा पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी तर दुबार पेरणीही वाया गेली आहे. जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केही पाऊस झालेला नाही. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्केही पाऊस पडलेला नाही. पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला असतानाच हवामान विभागाने येत्या तिन दिवसात पाऊस पुन्हा सुरू होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.