जळगाव। आरोग्याच्याबाबतीत जळगाव जिल्हा पूर्णपणे सक्षम करायचा आहे. येथील रिक्तपदे, अथवा सोयी-सुविधांबाबत उपाययोजना करण्यात येऊन येत्या तीन वर्षात जळगाव जिल्ह्यातील आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी अजिंठा विश्रामगृहात दिली. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनानंतर जळगावात अजिंठा विश्रामगृह येथे डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य विषयक आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करण्यात येणार्या कामांची माहिती दिली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागुराव चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलाणी यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकिय अधिकारी यांची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षापासून जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्तपदे असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे. काही वेळी उपचारासाठी आरोग्य अधिकारी नसल्यामुळे प्रसंगी अनेकांच्या जीवावर बेतते, असा मुद्दा यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मांडला. त्यावर बोलताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, रिक्त जागा 100 टक्के भरण्यासाठी दोनदा नव्हे तर तीन वेळा काढा जाहिरात काढा व ही पदे तत्काळ भरा, अशा सूचना त्यांनी केल्या. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे भरण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तीन महिन्यात रिक्त जागांचा ‘बॅकलॉग’ भरून निघेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
म्हसावद येथे लवकरच उपजिल्हारूग्णालय
रिक्त जागांचा प्रश्न तसेच बीएएमएस डॉक्टरांचाही प्रश्न गंभीर असल्याने 781 अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणादेखील डॉ. सावंत यांनी या वेळी केली. शिरसोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र तर म्हसावदला उपजिल्हा रुग्णालय म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोली येथे सुरू करण्यात येईल व म्हसावद येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला असता तेथे जागेची मोजणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. पाळधी येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्यात येऊन ते रुग्ण सेवेत येईल, असेही डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले. या आरोग्य केंद्रात सर्व सुविधा राहणार असून ते राज्यातील एकमेव असे मॉडेल आरोग्य केंद्र असेल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांची दुरवस्था व तेथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी प्रत्येक आठवड्याला या रुग्णालयांना भेटी द्याव्या व त्याचा अहवाल मला पाठवा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी आरोग्य अधिकार्यांना केल्या.