पुणे : मॉन्सूनने केरळ दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता. 27) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. त्यातच आज मॉन्सून अरबी समुद्राच्या काही भागात दाखल होण्याचे पोषक वातावरण हवामान विभागाने दर्शविले आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत (ता. 30) मॉन्सून केरळात आगमन होणार आहे.
शुक्रवारी मॉन्सूनने दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मॉन्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला होतो. केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. 27) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते सोमवारीही कायम आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातही सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.