मुंबई | आपण बँकांमध्ये काम करत असल्यास, हे वृत्त वाचून आपली झोप उडू शकते. सिटीबँकचे माजी सीईओ विक्रम पंडित म्हणतात, की पुढील 5 वर्षांत बँकिंग क्षेत्रातील 30 टक्के नोकऱ्या कमी होतील. बँका रोबोट्स आणि स्वयंचलित यंत्रे वापरण्यावर भर दिल्याने नोकऱ्यांवर गदा येईल, असे पंडित यांनी एका मुलाखतीत सांगितले.
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्सचा वापर वेगाने सर्व जगभरातील बॅंकांमध्ये केला जात आहे. याशिवाय लोक आता पारंपारिक बँकिंग करण्याऐवजी इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंग सेवांचा वापर करतात, असे पंडित यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा बँकांतील नोकऱ्यांना फटका बसेल, हे सांगणारे पंडित काही पहिलेच नाहीत. त्याआधी, बीसीजी समूहाचे सौरभ त्रिपाठी म्हणाले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि नैसर्गिक भाषा यांच्या सहाय्याने नवनवे मशीन येतील; तंत्रज्ञानामुळे बँकामधील अनेक कामे स्वयंचलित होतील. डेटा एंट्री करणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, ऑनलाइन फॉर्म भरणे हे सर्व मशीनद्वारे होऊ शकेल. पुढील तीन वर्षांमध्ये डेटा एंट्री वैगेरे तृतीय, चतुर्थ श्रेणी पातळीवरील कर्मचारी आवश्यक नसतील. आता पासबुकही आवश्यक नाही. ते ऑनलाईन उपलब्ध होते. मशीनचा वापर पैसे जमा करण्यासाठी केला गेल्याने मनुष्यबळाची गरज आताच कमी झाली आहे.
भीम अॅपनेही बदलेल चित्र
सरकारच्या भीम अॅपमुळेही ग्राहकांचे काम सोपे झाले आहे. पैसे युनायटेड पेमेंट इंटरफेसद्वारे (यूपीआय) मिनिटांत हस्तांतरित केले जातात. या अॅपचे नाव शरद आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीनंतर आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रसार झाल्यानंतर अनेक देयक बँका आणि डिजिटल देयक सेवा उदयास येत आहेत. अशा परिस्थितीत गुगल आता भारतात एक पेमेंट सेवा सुरू करण्याची तयारी करीत आहे. अमेरिकेत सध्या ही सेवा सुरु आहे. हे गुगल वॅलेट आणि अँन्ड्रॉईड पे सेवांहून वेगळे असेल. हे यूपीआयला मदत करेल. 18 सप्टेंबरला त्याची घोषणा केली जाईल, अशी चर्चा आहे.