येत्या रविवारी पश्‍चिम रेल्वेचा 1 हजारावा मेगाब्लॉक

0

मुंबई – येत्या रविवारी म्हणजेच 9 तारखेला पश्‍चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा मेगाब्लॉक पश्‍चिम रेल्वेच्या इतिहासातील एक हजारावा मेगाब्लॉक असणार आहे. दोन दशकांपूर्वी देखभालीच्या कामासाठी पश्‍चिम रेल्वेकडून मेगोब्लॉक घेण्यास सुरुवात झाली होती. येत्या रविवारी (9 एप्रिल) घेण्यात येणारा हा मेगाब्लॉक एक हजारावा मेगाब्लॉक ठरणार आहे.

रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. सोमवार ते शनिवार या कालावधीत तांत्रिक बिघाड आणि अपघात होऊ नयेत, यासाठी मेगाब्लॉक घेतला जातो.
येत्या रविवारी पश्‍चिम रेल्वेवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक हा पश्‍चिम रेल्वेच्या इतिहासातील एक हजारावा मेगाब्लॉक असणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर मरीन लाईन्स आणि माहिम दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

तसेच, या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेच्या अभियंत्यांकडून रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा यांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली जाते. पश्‍चिम रेल्वेवर पहिला मेगाब्लॉक 22 ऑक्टोबर 1995 रोजी घेण्यात आला होता. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

सुधारणांना प्राधान्य देण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी 1994-95 पासून पश्‍चिम रेल्वेवर दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाला सुरुवात झाली. देखभालीचे काम संपल्यावर त्याला मेगाब्लॉक असे नाव देण्यात आले. यानंतर अनेकदा रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाऊ लागला. या काळात लोकलच्या काही फेर्‍या रद्द केल्या जाऊ लागल्या, तर काही लोकल गाड्या इतर ट्रॅकवर वळवण्यात येऊ लागल्या, असे पश्‍चिम रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी माहिती देताना सांगितले.